सिडकोत मर्जीतील अधिकाऱ्यांना ''राजाश्रय''

सिडकोत मर्जीतील अधिकाऱ्यांना ''राजाश्रय''

सिडकोत मर्जीतील अधिकाऱ्यांना ''राजाश्रय'' विरोधात आलेल्या तक्रारींना केराची टोपली सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ९ : सिडकोमध्ये कार्यालयीन कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी न घेता दुसऱ्या विभागातील कर्मचाऱ्याची मदत घेण्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात तक्रार दाखल करून दोन आठवडे उलटून गेले, तरी सिडको प्रशासनाने तक्रारीची साधी दखलही घेतली नाही, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा सिडको वर्तुळात रंगली आहे. सिडकोमध्ये सामाजिक सेवा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संतोष पळशीकर यांनी २१ डिसेंबर २०२१ ला आपल्या विभागाचे काम पूर्ण करण्यासाठी दक्षता विभागात कार्यरत असलेल्या एका टंकलेखकाची कार्यालयीन सेवा घेतली. एखाद्या विभागात व्यक्तीची तात्पुरत्या कालावधीसाठी नेमणूक करायची असेल, तर त्यास रितसर प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागते. मात्र, या प्रकरणात पळशीकर यांनी प्रशासकीय मंजुरी घेतली नसल्याचा आरोप आहे. पळशीकर यांनी यापूर्वी दक्षता विभागात काम केले आहे. त्यापूर्वी ते व्यवस्थापक (कार्मिक) होते. एवढ्या वरिष्ठ पदावर काम केलेल्या अधिकाऱ्याने एवढी चूक करणे गंभीर बाब आहे. सिडकोमध्ये पर्यावरण व वने विभागात कार्यालयीन सहायक म्हणून काम करत असलेले दीपक भोपी यांनी या प्रकाराबद्दल सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकाकडे २२ डिसेंबरला रितसर तक्रार केली. मात्र, अजूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे भोपी यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे २०१७ मध्ये साडेबारा टक्के भूमी विभागात काम करत असलेल्या भोपी यांच्यावर याच कारणावरून सिडको प्रशासनाने कारवाई केली होती. तीन महिन्यांत त्यांची दुसऱ्या विभागात तडकाफडकी बदली केली होती. तीन वर्षे त्यांना कुठलेही प्रशासकीय काम देण्यात आले नव्हते. मग या कारवाईबाबत पळशीकर यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न भोपी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी शशिकांत महावरकर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. -------------------- न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगली आहे. मग ज्यांनी हीच चूक केली, त्यांच्यावरही समान कारवाई व्हायला पाहिजे. तरच मला न्याय मिळाल्याचे समाधान होईल. - दीपक भोपी, कार्यालयीन सहायक, पर्यावरण व वने विभाग, सिडको दक्षता विभागातील टंकलेखकाच्या सहकार्याकरिता प्रशासकीय मंजुरी एक दिवस आधीच घेतली होती. माझ्याविरोधात केलेल्या तक्रारीबद्दल अद्याप प्रशासनाने मला विचारणा केलेली नाही. - संतोष पळशीकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com