तळोजा एमआयडीसीचा उल्लेख प्रदूषित भागात करा
नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचा महाराष्ट्र सचिवांना पत्र
पनवेल, ता.१० (प्रतिनिधी) : पर्यावरण प्रभाव व जोखीम मूल्यांकन अहवालात कॉरिडॉरच्या १० किमी परिसरातील प्रदूषित प्रभागाच्या यादीत ठाणे व डोंबिवली एमआयडीसीचा उल्लेख आहे. मात्र या अहवालात तळोजा औद्योगिक क्षेत्राचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या मुळे अहवालात तळोजा एमआयडीसीचा उल्लेख व्हावा, अशी मागणी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणासंदर्भात म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये धाव घेतली आहे.
तळोजा एमआयडीसी मधूनच वसई-विरार कॉरिडॉर जात आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती सूचना जाणून घेण्यासाठी तहसीलदार विजय तळेकर यांनी बैठक बोलविली होती. तळोजा एमआयडीसी अत्यंत प्रदूषित भाग आहे. कासाडी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले असून यासंदर्भात अनेक कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने दंड ठोठावला आहे.
कासाडी नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी आयआयटी मुंबई यांनी देखील प्रस्ताव तयार केला आहे. असे असताना राज्याच्या पर्यावरण अहवालातून तळोजा एमआयडीसीला वगळण्यात आले, याबाबत म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नगरसेवक म्हात्रे यांनी लिहिलेल्या पत्रात तळोजा एमआयडीसीमधील विदारक परिस्थितीची माहिती दिली आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषण, त्यामुळे स्थानिकांना उद्भवणार समस्यां यांनी पत्रातून मांडल्या आहेत.