कांदिवली पश्चिमेतील पालिका रुग्णालय दुरवस्थेत
काँग्रेसच्या वतीने स्वच्छतेची मागणी
मालाड, ता. १० (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिकेचे रुग्णालय दुरवस्थेत आहे. या रुग्णालयातील अस्वच्छता आणि दुरवस्था दूर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ८ जानेवारीला वैद्यकीय अधिकारी डॉ. मंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी दीपक मोनानी, मुरुगण पिल्लई, संतोष चिकणे, आशिष आडलिंगे, राजेश हिराणी, अजय कानोजिया आदी उपस्थित होते.
हे उत्तर मुंबईतील मुख्य रुग्णालय आहे. येथे गोरेगाव, मालाड, मालवणी, कांदिवली पश्चिम आणि पूर्वेतून तसेच वसई-विरारहून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र या पालिकेच्या रुग्णालयात जिथे तिथे कचरा पसरलेला दिसतो. तसेच भटक्या कुत्र्यांची भीती सतावत असते. तसेच रुग्णालयात असलेले रुग्णांसाठीच्या शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे पालिका स्वच्छ भारत अभियान राबवत आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयात घाण अस्वच्छता पसरली आहे. रुग्णांच्या आरोग्यावर या घाणीचा परिणाम होऊ शकतो. रुग्णालय परिसर लवकरात लवकर स्वच्छ करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम थांबवावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
...