जिन्नस महागल्याने गृहिणींवर `संक्रांत`
गूळ, तीळ आणि सुक्या खोबऱ्याच्या दरांमध्ये वाढ
ठाणे, ता. १० (बातमीदार) : `तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला`, असे म्हणत मकरसंक्रांत या नववर्षाच्या प्रारंभी येणाऱ्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत; परंतु परस्परांमधील स्नेह वाढवणाऱ्या या संक्रांतीच्या सणाला यंदा महागाईची झळ बसली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ बाजारात चिक्की गूळ, पांढरे तीळ, सुके खोबरे आदी जिन्नसांच्या किमती १० ते १५ रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींवर संक्रांत ओढावली आहे.
मकरसंक्रांतीचा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या निमित्ताने साखरफुटाणे, तीळ-गुळाचे लाडू, तिळाची चिकी आदी पदार्थ घरोघरी हमखास बनवले जातात; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत तीळगुळाच्या लाडूंसाठी लागणाऱ्या जिन्नसाच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा संक्रांतीच्या गोडव्यासाठी गृहिणींना जास्तीची पदरमोड करावी लागणार आहे. तिळाचे लाडू तयार करण्यासाठी अधिकतर चिकीच्या गुळाचा वापर केला जातो. मागील वर्षी किरकोळ बाजारात ६५ रुपये प्रतिकिलोने मिळणारा हा गूळ यंदा ७५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.
मुख्यत्वे तिळाच्या लाडूंसाठी लागणारे पॉलिश केलेले पांढरे तीळ गेल्या वर्षी २०० रुपये प्रतिकिलोने विकले जात होते. यंदा त्यात २० रुपयांची वाढ झाली असून, सध्या ठाण्यातील किरकोळ दुकानात पांढरे तीळ २२० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. तिळाच्या लाडूंमध्ये वापरण्यात येणारे सुके खोबरे देखील यंदा २० रुपयांनी महागले असून सध्या २३० रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री होत आहे. शेंगदाण्याचे दर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १४० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहेत.
----
महागाई वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे दर महागले आहेत. तीळ, गूळ आदी जिन्नसांचे दर मधल्या काळात काहीसे स्थिर होते; परंतु मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळाच्या लाडूंसाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या मागणीत वाढ झाल्याने, त्यांच्या किमतीतही यंदा साधारण १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.
- केवल शहा, किरकोळ विक्रेते.
महागाईच्या काळात घरातील बजेट सांभाळताना चांगलीच तारांबळ उडते. संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू हा पदार्थ घरी बनवावाच लागतो. मात्र जिन्नसांच्या किमती वाढल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा केवळ प्रत्येकी अर्धा किलो जिन्नसांची खरेदी केली आहे.
- नम्रता पवार, ग्राहक.
तिळगुळातील जिन्नसांचे किरकोळ दर (प्रतिकिलो)
जिन्नस २०२१ २०२२
पॉलिश तीळ २०० २२०
चिकीचा गूळ ६५ ७५
शेंगदाणे १४० १४०
सुके खोबरे २१० २३०
नवनवीन पदार्थ बाजारात
मकरसंक्रांतीच्या सणाचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी ठाण्यातील बाजारपेठेत यंदा तिळापासून तयार केलेले नवनवीन पदार्थ विक्रीसाठी आले आहेत. तिळगुळापासून बनवण्यात येणाऱ्या राजस्थानमधील प्रसिद्ध गजक पदार्थाच्या नवीन चवी खाद्यप्रेमींसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ठाण्यातील प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात संक्रांतीनिमित्त गोल्डन शालीमार गजक, चॉकलेट गजक, गोल्डन खास्ता असे पदार्थ उपलब्ध झाले आहेत. या पदार्थांचे दर ६८० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत; तर तिळाची चिकी ३०० ते ५०० रुपये प्रतिकिलो आणि तिळाचे लाडू १६० ते २०० रुपये प्रतिकिलो दरामध्ये उपलब्ध आहेत.