आरोग्यासंबंधी सुविधांसाठी डॉक्टरांचे यूट्युब चॅनेल
नालासोपारा मेडिकल असोसिएशनचा पुढाकार
विरार, ता. १० (बातमीदार) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या सर्दी, ताप आला तरीही डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागरिकांना कोरोनाची लक्षणे आणि सामान्य ताप, अन्य आरोग्य सुविधांबद्दल माहिती मिळण्यासाठी नालासोपाऱ्याच्या डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आरोग्याशी निगडित प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी यूट्युब चॅनेल सुरू करण्यासाठी नालासोपारा मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
रविवारी, १६ जानेवारी रोजी ओमिक्रॉन आणि कोरोनाची तिसरी लाट या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यंग स्टार ट्रस्ट आणि तथास्तू ग्रुपच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात राज्य टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे, सेव्हन हिल रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. स्मिता चव्हाण व डॉ. रवींद्र देशपांडे आपले विचार मांडणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
अजूनही लोकांमध्ये कोरोनाबाबत गैरसमज आहेत. चुकीची माहिती पसरवण्यात येत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता कोणती काळजी घ्यावी आणि उपचार कसे करावेत, याची माहिती देण्यासाठी डॉक्टरांनी एकत्र येत हे चॅनेल सुरू केले आहे. तसेच नागरिकांना आरोग्यविषयक विविध विषयांवर शिक्षित आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
चौकट
दर महिन्याला दोन कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यातील एक मराठी; तर हिंदी भाषेत होणार आहे. यासाठी वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेतली जाणार आहे.
- डॉ. सचिन पाटील, सचिव
नालासोपारा मेडिकल असोसिएशन