सहायक कमांडंट परीक्षेत
भावना यादव मुलींमध्ये पहिली
विरार, ता. १० (बातमीदार) : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या सहायक कमांडंट पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विरारमधील भावना यादव हिने देशात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भावना यादव ही मूळची सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीची. तिचे वडील सुभाष यादव हे मुंबई पोलिस दलात सहायक फौजदार असून ते बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. भावनाचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाले. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण मिरारोडच्या शांतिपार्क येथील सेंट झेवियर्स शाळेत झाले. त्यानंतर विवा महाविद्यालयातून पदवीत्तुर शिक्षण घेतले. तिने २०१५ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुरवात केली होती. ती राज्य लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दोनवेळा उत्तीर्ण झाली होती; मात्र मैदानी परीक्षेत अपयश आले होते.
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेतही भावना उत्तीर्ण झाली होती; मात्र मैदानी परीक्षेत पुन्हा अपयश आले. तिने अपयशाने खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात मैदाने बंद असल्याने एका विकासकाच्या खासगी जागेत तिने सराव सुरू केला होता. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले. विवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भावना यादव हिचे अभिनंदन केले आहे.
चौकट
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सशस्त्र दलाच्या सहायक कमांडंट पदासाठी २०२० मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाला असून, यात देशातील एकूण १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात भावना १४ व्या क्रमांकावर आहे. ती देशात मुलींमध्ये पहिली आली असून महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे.