ठाणे पालिकेच्या भंडार्ली प्रकल्पाला ग्रामस्थांचा `ब्रेक` | thane news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Municipal corporation

ठाणे पालिकेच्या भंडार्ली प्रकल्पाला ग्रामस्थांचा `ब्रेक`

sakal_logo
By

डोंबिवली : ठाणे महापालिकेच्या (thane municipal corporation) महत्त्वाकांक्षी भंडार्ली कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे काम पहिल्याच दिवशी येथील ग्रामस्थांनी बंद पाडले. भूखंडाची साफसफाई आणि सपाटीकरण करण्यासाठी यंत्रांसह कामगारांचा मोठा फौजफाटा घेत पालिकेचे पथक येथे पोहोचले होते. मात्र ग्रामस्थांना याची कुणकुण लागताच त्यांनी भंडार्लीकडे (bhandarli project) कूच करत तब्बल पाच तास विरोध प्रदर्शन केले. पोलिस बळाचा वापर करत विरोधाकडे दुर्लक्ष करण्याचा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला प्रयत्नही ग्रामस्थांच्या ठिय्यामुळे फसला. (Thane municipal corporation bhandarli project closed due to people strike)

हेही वाचा: मुंबईकरांना दिलासा! सहा हजारांनी रूग्णसंख्या घटली

एकीकडे निर्माण झालेला प्रचंड तणाव आणि त्यातून कोणताच मार्ग निघत नसल्याने अखेर पालिकेच्या पथकाने माघार घेत तूर्तास हे काम थांबवले आहे. दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करून शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प भंडार्ली येथे उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासंबंधीचे सर्व भाडेकरार पूर्ण केल्यानंतर प्रकल्पाला वेग देण्यासाठी प्रत्यक्ष काम पालिकेने हाती घेतले आहे. सोमवारी (ता. १०) त्याअंतर्गत या भूखंडाची साफसफाई करत सपाटीकरण करण्यात येणार होते.

मात्र नवी मुंबई पालिकेतील वगळलेल्या १४ गावांचा या प्रकल्पाला अद्याप विरोध कायम आहे. त्यामुळे पालिकेचे पथक येणार असल्याची माहिती मिळताच १४ गाव सर्वपक्षीय विकास समिती व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. पण ठाणे पालिका अधिकारी शीळ-डायघर येथील पोलिस फौज फाट्यासह या ठिकाणी आले असल्याने गावकऱ्यांना गावाच्या वेशीवरच रोखून धरण्यात आले. ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र `काम थांबवा` या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत येथे कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन देऊनही आज येथे पालिकेच्या गाड्या का आल्या, आम्ही पूर्ण सहकार्य करत विरोध करत असताना पोलिस बळाचा वापर का केला जातो, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, डम्पिंगचे काम पहिले थांबवा, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थांनी मांडली. येथे कचरा आणून टाकला नाही, केवळ जागेच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे, असे उपायुक्त जोशी यांनी सांगूनही ग्रामस्थ ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते. तीन ते चार तास प्रयत्न करून देखील ग्रामस्थ ऐकण्याच्या भूमिकेत नाही, हे लक्षात येताच उपायुक्त जोशी, पोलिस व समितीमधील काही मंडळींच्या उपस्थितीमध्ये कामाच्या ठिकाणी पहाणी करण्यास गेले.

तेथेही समितीच्या अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात येईल, तोपर्यंत हे काम थांबवण्यात येत असल्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. पालकमंत्र्यांच्या शिष्टाईची प्रतीक्षा शीळ-डायघर पोलिस ठाणे येथे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, १४ गाव सर्वपक्षीय विकास समिती पदाधिकारी, ठाणे पोलिस उपायुक्त, पालिका अधिकारी यांची एक बैठक पार पडली.

हेही वाचा: मुंबई : अल्पवयीन कुमारी मातेसह आरोपीस अटक

यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे काम थांबविण्यात आल्याचा निर्णय झाला. पालकमंत्री शिंदे हे कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याने आता पालकमंत्र्यांच्या शिष्टाईची प्रतीक्षा आहे. ठाण्याचा कचरा १४ गावांच्या माथी नकोच कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे पालिका हद्दीत खूप जागा आहेत.

ज्या भागाचा कचरा त्याची तिथेच विल्हेवाट लावली गेली पाहिजे. मात्र गृहसंकुलात निर्माण होणारा कचरा १४ गावांच्या माथी मारायचा. चांगले प्रकल्प ठाण्यात राबवायचे आणि त्यांचा कचरा इकडे टाकायचा, या भूमिकेला शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी विरोध दर्शवला आहे. मनसे आमदाराचा ट्विटरवरून पाठिंबा मनसे आमदार राजू पाटील यांनी याबाबत ट्विट करत आंदोलनास पाठिंबा दिला. अजून सर्व परवानग्या आल्या नाहीत, त्यावर होणारा विरोध, असे असताना ही जबरदस्ती कशासाठी, सत्तेची एवढी मुजोरी बरी नाही, असे आमदार पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने येथे डम्पिंगचे काम सुरू झालेले नाही; तर शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले आहे. बैठकीमध्ये ग्रामस्थांना जी आश्वासने दिली, त्यानुसारच काम केले जात आहे. जागा निवड समितीची यास ना हरकत आहे. ग्रामस्थांचा विरोध असणे स्वाभाविक आहे, त्याचा विचार केला जाईल. - मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Thane
loading image
go to top