कोविडसाठी आकस्मिक निधीतून ३०० कोटी
प्रशासनाकडून प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कोविड व्यवस्थापनावर २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक हजार ३०३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यापाठोपाठ आता आकस्मिक निधीतून ३०० कोटी रुपये कोविडसाठी वळवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. दरम्यान, आतापर्यंत ४०० कोटी रुपयांचा निधी आकस्मिक निधीतून उपलब्ध केला आहे.
कोविड व्यवस्थापन तसेच इतर उपाय व नियोजनासाठी महापालिकेने विविध खात्यांमधून एक हजार ३८० कोटी रुपये राखून ठेवले होते. त्यातील १ हजार ३०३ कोटी रुपये नोव्हेंबर महिन्यापर्यंत खर्च झाले आहेत, तर अतिरिक्त खर्चाची गरज असल्याने आता आकस्मिक निधीतून आणखी ३०० कोटी रुपये वळवण्यात येणार आहेत. तसेच भविष्यातही कोविड व्यवस्थापनासाठी आणखी पैसे लागणार आहेत. त्यामुळे भूसंपदानासाठी राखून ठेवलेला निधी आता कोविडसाठी वापरण्यात येणार आहे, तशी माहिती प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. आतापर्यंत आकस्मिक निधीतून ४०० कोटी रुपयांचा निधी कोविडसाठी उपलब्ध करून दिला आहे.
---
ऑक्सिजन यंत्रणेसाठी एक कोटी
मालाड जम्बो कोविड केंद्रात प्रत्येकी ४० टन क्षमतेची द्रवरूप ऑक्सिजनची टाकी उभारले आहेत, तसेच राखीव साठा म्हणून ४० ड्युरा सिलिंडरही सज्ज ठेवण्यात आले आहे. ऑक्सिजन रुग्णांच्या खाटांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईन कार्यरत करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उपकरणांचा पुरवठा करण्यासोबतच त्याची चाचणी करण्यासाठी महापालिका एक कोटी रुपयांचा खर्च करणार आहे, तसा प्रस्तावही स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.
----
शॉर्ट सर्किटचा धोका कमी होणार
मालाड येथील जम्बो कोविड केंद्रातील विद्युत वाहिन्या, उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगीचा धोका कमी करण्यासाठी महापालिका इलेक्ट्रो मॅग्नेटिक सेन्सर सिस्टिम बसवणार आहे. त्यासाठी ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या जम्बो कोविड केंद्रासाठी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.