५६ हजार तरुणांना लस कवच
तिसऱ्या डोसचा शुभारंभ ; पहिल्या टप्प्यात ६२१ जणांना लस
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : महापालिकेतर्फे ३ जानेवारीला सुरुवात करण्यात आलेल्या १५ ते १८ वर्षांआतील मुलांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाला एकूण ७७ टक्के आव्हान पूर्ण करण्यात यश आले. आज दिवसअखेर महापालिकेच्या आरोग्य विभागाने ६ हजार २३८ मुलांना लस टोचली. या लसीकरणामुळे महापालिकेने एकूण ५६ हजार ५३७ मुलांना पहिला डोस टोचला. तसेच आजपासून पहिल्या फळीत कोविडयोद्धा आणि ज्येष्ठ नागरिकांना तिसऱ्या डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
नवी मुंबई महापालिकेने कोविड लसीकरणात पहिला डोस १०० टक्के नागरिकांना देण्यात एमएमआर क्षेत्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता महापालिकेने कोविडचे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरणाचे ध्येय पार करण्याच्या दृष्टीने पावल टाकले आहेत. ३ जानेवारीला शहरात लहान मुलांसाठी लसीकरणाचे विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळा, नागरी आरोग्य केंद्र आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. रोज आठ हजारांपेक्षा जास्त मुलांना लस टोचण्याचे नियोजन महापालिकेतर्फे करण्यात आले होते. त्याचीच फलश्रृती म्हणून महापालिकेने अवघ्या सात दिवसांमध्ये ५६ हजार ५३७ मुलांना लस टोचून ७७ टक्के लसीकरणाचे आव्हान सहजरित्या सर केले आहे. तसेच आज सकाळपासून केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या कार्यक्रमात आज ६२१ जणांना कोविड लसीकरणातील तिसरा डोस देण्यात आला. त्यापैकी ६२० लोकांना कोविशिल्ड, तर एकाला कोव्हॅक्सिन डोस टोचण्यात आला.