फुंडे, पाणजे ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेत
उरणमध्ये जाण्यासाठी वेळ व पैसा अधिक खर्ची
उरण, ता. १० (वार्ताहर) ः तालुक्यातील फुंडे, डोंगरी, पाणजे या गावांना उरण शहरांशी जोडणारा साकव (पूल)एप्रिल २०२१ मध्ये अचानक पडला. त्यामुळे नागरिकांना वळसा घालून शहरात यावे लागत असल्याने वेळ आणि पैसा अधिक खर्च होत आहे. सिडकोने पुलाची दुरस्ती करून प्रवास सुखकर करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सिडकोने तीस वर्षांपूर्वी फुंडे, पाणजे, आणि डोंगरी या गावांना उरण शहरासाठी जोडण्यासाठी फुंडे येथे पूल बांधला होता. एप्रिल २०२१ मध्ये हा पूल पडला. यामध्ये एका युवकांचा मृत्यूही झाला होता. हा पूल पडल्याने गावातील नागरिकांना वळसा घालून लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांच्या खर्चातही वाढ झाली आणि वेळही वाढला आहे.
पुलाच्या बांधकामाबाबत सिडकोकडे अनेकदा पाठपुरावा केला, मात्र अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे फुंडे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. सिडकोने विकासाच्या नावे गावांतील जमीनी कवडी मोल भावाने घेतल्या, मात्र येथील नागरिकांना सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. फुंडे गावाजवळील पडलेला पूल लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
फुंडे पूल पडल्याने या तीन गावातील नागरिकांना उरणमध्ये येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय वेळ व पैसा वाया जातो. या संदर्भात सिडकोकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
- ॲड. सागर घरत, सरपंच फुंडे
सिडकोने सीआरझेड क्लिअरन्ससाठी नवी मुंबई एसईझेड कार्यालयाकडे पाठविला आहे. तिथून मंजुरी मिळाल्यास पुलाचे कामाला सुरुवात केली जाईल.
सचिन टेकाले, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सिडको