लोकल प्रवाशाचा मोबाईल चोरणारा अटकेत
मानखुर्द, ता. ११ (बातमीदार) : रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरून पळालेल्या चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांनी उलवे येथून सोमवारी (ता. १०) अटक केली. अक्षय मणवर (२१) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून मोबाईल जप्त केला आहे. अक्षय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात नवी मुंबईमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद आहे. नुकताच तो शिक्षा भोगून आला होता. कामोठे येथील रहिवासी आत्माराम जाधव (३१) शुक्रवारी (ता. ७) शिवडी ते मानसरोवर असा प्रवास करत होते. रात्री १०.३० च्या सुमारास लोकल सीवूड स्थानकातून सुटली. त्या वेळी लगेज डब्यात त्यांच्यासह प्रवास करत असलेल्या अक्षयने जाधव यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळ काढला. अक्षयविरोधात आत्माराम यांनी वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून अक्षयची ओळख पटवली. त्यानुसार सीवूड परिसरात शोध घेतला पण तो सापडला नाही. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उलवे सेक्टर १५ मध्ये त्याचा शोध घेऊन अटक केली.