तळोजामध्ये जमावबंदीचे आदेश धाब्यावर
कोरोनाच्या संख्येत वाढ होत असताना अनधिकृत बाजार जोरात
खारघर, ता. ११ (बातमीदार) ः राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे शासनाने कोरोना निर्बंध कठोर केले असून सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहेत. असे असताना तळोजा वसाहतीत जमावबंदीचे आदेश झुगारून अनधिकृत आठवडा बाजार भरविला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आठवडी बाजार भरविणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अतिक्रमण पथकावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पनवेल महा क्षेत्रातील खारघर नोडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असताना खारघरमधील ओवेगाव, खुटुकबांधण, खारघर सेक्टर १९ तसेच तळोजा फेज एक आणि दोन मध्ये आठवडी बाजार भरविले जात आहे. खारघरमधील वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी पालिकेने खारघर, तळोज्यासाठी सकाळ आणि दुपार सत्रात दोन स्वतंत्र अतिक्रमण पथकांची नियुक्ती केली आहे. सरकारने राज्यात दिवसा जमाव बंदी लागू केली असताना तळोजा सेक्टर चारमध्ये सोमवारी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत भरविण्यात आलेल्या आठवडी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात अनेकजण विनामास्क फिरत होते.
बंदी असतानाही आठवडी बाजार भरविले जात असून कारवाईकडे दुर्लक्ष केला जात आहे. याचा अर्थ आठवडी बाजार भरविणाऱ्या दादा मंडळींवर कुणाचातरी वरदहस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कारवाईचा देखावा
पनवेल महापालिकेने बांधकाम, फेरीवाले आणि आठवडी बाजार आदी अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सकाळ आणि दुपार दोन सत्रात पथकाची निर्मिती केली आहे. आठवडी बाजार विषयी नागरिकांनी पालिकेकडे कारवाईची मागणी केल्यास तत्काळ कर्मचारी पाठवून कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले जाते. मात्र अतिक्रमण पथक रात्री नऊनंतर बाजार उठताना कारवाईचा केवळ देखावा करीत असल्याचे परिसरातील स्थानिकांचे म्हणणे आहे.
तळोजा फेज एक मध्ये आठवडी बाजार सुरू असल्याची माहिती मिळताच, अतिक्रमण पथकाने त्वरित बंद केले. तसेच या ठिकाणी पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर
फोटो