सर्वोदय विलगीकरण कक्षाची सहायक आयुक्तांकडून पाहणी
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेने कोविड केंद्र वाढवला आहेत. आज घाटकोपर पश्चिमेकडील सर्वोदय या लग्नाच्या हॉलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील विलगीकरण कक्षाची एन वार्ड सहायक आयुक्त संजय सोनावणे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
नगरसेविका अश्विनी हांडे यांच्या प्रयत्नाने सर्वोदय हॉल येथील विलगीकरण कक्षात रुगांसाठी ५०० बेडची सुविधा तयार करण्यात आली आहे. कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्यांना येथे ठेवण्यात येणार आहे. येथे स्वच्छतेसाठी पालिकेचे सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक सेवेत ठेवले जाणार असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विलगीकरण कक्षात ठेवल्या जाणाऱ्या रुग्णांच्या जेवणामध्ये आळ्या सापडल्याच्या कारणावरून विरोधी पक्षांनी आवाज उठवला होता. त्या पार्श्वभूमीवर विलगीकरण कक्षात येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही अडचणीचा त्रास होणार नाही तसेच रुग्णांसाठी येणारे जेवण उत्तम प्रकारे असेल याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ, असे सोनावणे यांनी पाहणीच्या वेळी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी महेंद्र खंदारे, एन वार्ड प्रभाग समिती अध्यक्ष स्नेहल मोरे, माजी नगरसेवक दीपक हांडे आदी उपस्थित होते.
...