लसीकरणासोबत चाचण्याही वाढवा
आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी आढावा घेतला. सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देतानाच शहरात लसीकरणासोबत आरटीपीसीआर व अॅन्टीजन चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुविधांबाबतची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस उपआयुक्त मारुती खोडके, अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या कोविड रुग्णालयात आवश्यक औषधसाठा, व्हेटिलेंटर्स, ऑक्सिजन सुविधा व इतर वैद्यकीय सुविधा तसेच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वोल्टास कोविड हॉस्पिटलची संपूर्ण यंत्रणादेखील सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, ठाणे शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांशी दैनंदिन संपर्क साधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे व आवश्यकता भासल्यास त्यांना क्वारंटाईन करणे, यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
स्टेशन परिसर व प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आरटीपीसीआर व अॅन्टीजन चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.