तोतया पोलिसाने ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले
गस्त वाढविण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी घणसोलीतील एका ज्येष्ठ नागरिकाला लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. रबाळे पोलिसांनी तोतया पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घणसोलीत गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना वाढल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली आहे.
घणसोली सेक्टर-१ मधील एफ टाईप सोसायटीत राहणारे चंद्रमणी भोसले हे ज्येष्ठ नागरिक सोमवारी दुपारी घणसोलीतील घरोंदा वसाहतीत नातेवाईकांकडे पायी जात होते. यावेळी आलेल्या तिघांनी पोलिस असल्याचे सांगून त्यांना दागिने काढून ठेवण्यास सांगितले. आणि मदतीच्या बहाण्याने हातचलाखी करून ते लंपास केले. काही वेळानंतर भोसले यांनी दागिने तपासले असता ते चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
चौकट
पोलिस असल्याची व इतर पद्धतीने बतावणी करून ज्येष्ठ नागरिक व महिलांना लुबाडणाऱ्यांचा घणसोली परिसरात वावर वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी घणसोली व आजूबाजूच्या परिसरामध्ये गस्त वाढवावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे यांनी केली आहे.
...............
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मंगळसूत्र हिसकावले
आनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : मुलीसह मार्केटमध्ये खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी सीवूड्स परिसरात घडली. एनआरआय पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
कांतीदेवी सिंग (५४) या सीवूड्स सेक्टर-४४ मध्ये कुटुंबासह राहत असून सोमवारी सायंकाळी मुलीसह सीवूड्स सेक्टर-४८ मधील मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. सावळा चौकातून अक्षर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पायी जाताना पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ दुचाकी उभी केली. त्यानंतर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने कांतीदेवी यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले आणि पलायन केले.
कांतीदेवी यांनी आरडाओरड केल्यानंतर त्या भागात असलेल्या एका तरुणाने दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पसार झाले. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.