खारेगाव पुलाचा मुहूर्त हुकला
नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्याचा दावा फोल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मागील महिन्यात कळवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या श्रेयावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपल्याचे चित्र दिसून आले. त्यात हा पूल नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणारा असल्याचा दावादेखील करण्यात आला होता; मात्र अद्यापही या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा दावादेखील फोल ठरत असल्याचे दिसून येत असून हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा सवालदेखील उपस्थित होत आहे.
मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गिकेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान खारेगाव रेल्वे फाटक आहे. फाटकाच्या पूर्व दिशेला आतकोनेश्वर नगर, भास्करनगर, वाघोबानगर, घोलाईनगर हा भाग येतो. हजारो नागरिक या भागात वास्तव्य करतात; मात्र या भागात शाळा, मुख्य बाजारपेठ नसल्याने येथील नागरिक रेल्वे फाटक ओलांडून खारेगाव म्हणजेच फाटकाच्या पश्चिम दिशेला येत असतात. यामुळे अपघातही होत असून त्याचबरोबर लोकल वाहतुकीतही व्यत्यय निर्माण होते. या पार्श्वभूमीवर खारेगाव फाटकाजवळ रेल्वे उड्डाणपूल उभारणीचा निर्णय मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यात २०१५ मध्ये या उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात झाली होती.
रेल्वेने आपल्या हद्दीतील कामे पूर्ण केली आहेत; तर जमिनीचे वाद, तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे महापालिकेला उर्वरित कामे करता आली नव्हती. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्यानंतर प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढला होता. सुरुवातीला एप्रिल २०२१ मध्ये आणि त्यानंतर २० डिसेंबरला पुलाचे काम पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हा मुहूर्त टळल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी २५ डिसेंबरची तारीख देण्यात आली होती. त्या तारखेलाही पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नव्हते.
नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात या पुलाचे लोकार्पण केले जाणार असून याचा वापर सुरू केला जाईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली होती; मात्र अद्यापही या पुलाचे काम शिल्लक असून ते पूर्ण करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा सवालदेखील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कोट
खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाची कामे अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका पदाधिकारी उद्घाटनाची तारीख ठरवतील आणि त्यानंतर हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठामपा.