साथरोगाचे संकट कायम
नऊ दिवसांत मलेरियाचे ४३ रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : नववर्षातही मुंबईत साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. १ ते ९ जानेवारीदरम्यान मुंबईत मलेरियाचे ४३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गॅस्ट्रोच्या ९६ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लेप्टो, डेंगी, चिकनगुनिया आणि एच १ एन १ हे आजार नियंत्रणात असल्याचे पालिकेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.
मुंबईत शनिवारी अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा पावसाळी आजार वाढण्याची भीती पालिकेने व्यक्त केली आहे. तूर्तास मलेरिया आणि गॅस्ट्रो हे आजार सोडल्यास इतर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ न झाल्याने सध्या तरी दिलासादायक चित्र आहे.
गेल्या वर्षी मलेरियाच्या एकूण ५१९३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती; तर लेप्टोचे २२४ रुग्ण नोंदवले गेले होते. याशिवाय डेंगीचे ८७६, गॅस्ट्रोचे ३११०, हेपेटायटिसचे ३०८ आणि चिकनगुनियाचे ८० रुग्ण सापडले होते. मुंबईसमोर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट उभे ठाकले आहे. त्यात अजूनही साथरोगाचे संकट कायम आहे. त्यामुळे साथीचे आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
१ ते ९ जानेवारीदरम्यान
सापडलेले रुग्ण
मलेरिया ४३
लेप्टो १
गॅस्ट्रो ९६
कावीळ ७