किरकोळ व्यापाराचा वेग
कोरोनामुळे डिसेंबरमध्ये मंदावला
रिटेलर्स असोसिएशनचे सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील किरकोळ व्यापाराने वेग घेत असला, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे डिसेंबरअखेरपासून तो पुन्हा मंदावला आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या ताज्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
कोरोनापूर्व काळाच्या म्हणजे २०१९ च्या डिसेंबर महिन्यापेक्षा २०२१ च्या डिसेंबरमधील एकूण विक्री फक्त सात टक्के जास्त आहे. २०२० च्या तुलनेत ही विक्री २६ टक्के वाढली आहे. डिसेंबर महिन्यात विक्री चांगली वाढली होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे डिसेंबरअखेरीस स्थानिक पातळीवर निर्बंध लादल्याने विक्रीवर परिणाम झाला, असे असोसिएशनच्या २३ व्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
देशभरात नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२१ मध्ये विक्री नऊ टक्के वाढली, पण याच दोन वर्षांच्या डिसेंबरची तुलना केली तर विक्री फक्त सात टक्के वाढली. ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स व क्रीडा साहित्य यांची विक्री नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत चार ते आठ टक्के घटली. डिसेंबरमध्ये पादत्राणांची विक्री सात टक्के रोडावली. फर्निचरची विक्री पाच टक्क्यांनी घसरली.
रुग्णसंख्येनुसार निर्बंधांचा विचार करा!
डिसेंबरअखेरीस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लादले जात असल्याने विक्रीवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत केवळ रुग्णांच्या संख्येवरून निर्बंध लादण्याचा निर्णय घेऊ नये. रुग्णालयात किती रुग्णांना दाखल करावे लागते, त्यावरच निर्बंधांचा निर्णय घेण्यास राज्यांना सांगावे, अशी विनंतीही असोसिएशनने केंद्र सरकारला केली आहे.