महाविकास आघाडीत काँग्रेस एक पाऊल पुढे
इच्छुक उमेदवारांची नावे मागवली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : कोविडमुळे रखडलेल्या महापालिका निवडणुका येत्या मे महिन्यांत होण्याची दाट शक्यता आहे. त्याधर्तीवर काँग्रेसतर्फे नवी मुंबई शहरातील इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्षांना इच्छुकांची नावे मागवण्याचे लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. या पत्रातही स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेश संघटन व प्रशासनाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कार्यकारणीला लेखी पत्र सादर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी एकत्र करण्याच्या सूचना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्षकांकडे इच्छुकांनी नावे नोंदवल्यानंतर त्यांच्या मार्फत काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाला नावांची यादी पोहोचवली जाणार आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्यानंतर पटोलेंच्या धाडसी निर्णयामुळे काँग्रेस प्रदेश आणि जिल्हा कार्यकारणीत अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि त्याला पोषक वातावरण असताना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन आणखीन एक धाडस दाखवले आहे. आता इच्छुकांच्या नावांची यादी मागवतानाही काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीच्या आधीच मुहूर्त साधल्याने नवी मुबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
महाविकास आघाडीतील सहकारी मित्रपक्षांच्या आधीच काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवल्यामुळे काँग्रेसकडून प्रचाराचा नारळही लवकरच फुटणार असल्याचे दिसत आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत काँग्रेस कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत इच्छुकांनी आपली नावे सादर करण्याबाबतच्या सूचना देण्यात येणार आहे.
- अनिल कौशिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई