प्रभाग सुधारणेची कामे पूर्ण होऊनही बिले अडकली
९५ कोटीपैकी २५ टक्के बिले अदा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. मागील काही महिने कोरोनाची लाट आटोक्यात आल्याने त्याचा परिणाम महापलिकेच्या उत्पन्नवाढीवर झाल्याचे दिसून आले आहे. महापलिकेच्या निवडणुकादेखील तोंडावर येऊन ठेपल्या असल्याने शहराच्या विविध भागांत नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभाग सुधारणा, नगरसेवक आणि मागासवर्गीय निधीच्या कामांचा सपाटा सुरू झाला आहे. दुसरीकडे मागील वर्षी प्रभाग सुधारणाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांची केवळ २५ टक्के बिले काढण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित बिले केव्हा मिळणार, असा प्रश्न ठेकेदारांसमोर उभा ठाकला आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले आता टप्याटप्याने निघू लागली आहेत. येत्या काही महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात लोकप्रतिनिधींच्या माध्यामातून कामांचा सपाटा सुरू झाला आहे. त्यानुसार प्रभाग सुधारणा, नगरसेवक निधी आणि मागासवर्गीय निधीअंतर्गत रस्ते, गटार, पायवाटा याची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यानुसार ठेकेदारांकडून ही कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी नगरसेवकांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून मागील वर्षी म्हणजेच २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रभाग सुधारणा निधीअंतर्गत सुमारे ९५ कोटींची कामे करण्यात आली आहेत. या कामांची २५ टक्के बिले डिसेंबर महिन्यात काढण्यात आली आहेत. उर्वरित बिले निघण्याची वाट आता ठेकेदार पाहत आहेत. ही बिले लवकरात लवकर काढावीत, अशी अपेक्षा ठेकेदारांकडून व्यक्त केली जात आहे.