महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कागदावरच
गावागावतील वाद मिटवण्यासाठी मोहीम सक्रिय करण्याची गरज
नरेश जाधव
खर्डी, ता. ११ (बातमीदार)ः १५ ऑगस्ट २००७ रोजी माजी दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी गावागावांतील भांडण, वाद गावातच सामोपचाराने मिटवण्यात यावा व गावात सलोखा निर्माण व्हावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती. सातआठ वर्षे या याजेनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बरेच वाद गावपातळीवर मिटले. शहापूर तालुक्यात तेव्हा विविध प्रकारचे शेकडो तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटवण्यात तंटामुक्त समितीला यश आले होते, पण ही योजना गेल्या चारपाच वर्षांपासून कागदावरच असल्याचे दिसत आहे. तंटामुक्त समितीला मरगळ आल्याचे दिसत असून शासकीय अधिकारीही या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
गेल्या चारपाच वर्षांपासून या मोहिमेतील सदस्यांमध्ये मरगळ आल्याने व पोलिस विभाग याबाबत उत्साह दाखवत नसल्याने अनेक ठिकाणी किरकोळ वादाचे रूपांतर जोरदार भांडणात होत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात जमीन विक्री-वाटपात भाऊबंदकीची किरकोळ भांडणे विकोपास जात आहेत. त्यामुळे आपसूकच आपसातील वैर वाढून भांडणाचे प्रमाण वाढले आहे. गावातच मिटणारी भांडणे पोलिस ठाण्यात गेल्यावर जामीन देणे, वकील करणे व जमीनदारांच्या मागण्या पूर्ण करणे यासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहेत. यामुळे गावागावांत पुन्हा अशांतता पसरत आहेत.
----
‘‘गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शहापूर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती बिनविरोध करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले होते. सद्यस्थितीत या योजनेला सक्रिय करण्याची गरज असून निवडणूक काळात गावात शांतता राखणे गरजेचे आहे.
शाम परदेशी, पोलिस पाटील, खर्डी ग्रामपंचायत