फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या कामासाठी नवीन कंत्राटदार नेमणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ ः अंबरनाथ तालुक्यातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या मलंगगडावर भाविक, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे; मात्र गेली कित्येक वर्षे हे काम रखडलेले असून अद्याप ते मार्गी लागलेले नाही. अखेर हे काम पूर्ण करण्यास कंत्राटदार सक्षम नसल्यचे सांगण्यात आले असून लवकरच नवीन कंत्राटदारास हे काम देण्यात येणार आहे. यासाठी १० ते १५ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी उबलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. नवीन कंत्राटदाराची नेमणूक होऊन हे काम मार्गी लागण्यास आणखी काही काळ लोटणार असल्याने पर्यटकांना फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा मिळवण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
मलंगगड परिसराचा विकास होत असतानाच फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम कधी मार्गी लागणार याविषयी खासदार शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, परिसरातील रस्त्यांची कामे, छोटे साकव, पाण्याचा प्रश्न आदी विकासकामांसाठी निधीची उपलब्धता झाली असून या विकासकामांना सुरुवात झाली आहे. कंत्राटदारांच्या अकार्यक्षमतेमुळे फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प खूप वर्षांपासून रखडला आहे. वारंवार बैठका घेतल्या गेल्या, कंत्राटदारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र काही झाले नाही. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा कंत्राटदार काम पूर्ण करू शकत नसल्याने त्याचे कंत्राट पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून संपुष्टात आणण्यात येईल. नवीन कंत्राटदारास हे काम दिले जाईल. यासाठी १० ते १५ कोटी रुपये लागतील त्यासाठी निधी देण्याचे काम करण्यात येईल असे ते म्हणाले.