मायक्रोबायोमे ‘द स्टोरी अनटोल्ड’
ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद पार
ठाणे, ता. ११ (बातमीदार) : हजारो सूक्ष्मजीवांचा समूह असणारा मायक्रोबायोम आणि त्याचे मानवी शरीरावर होणारे परिणाम याचा उहापोह करणारी ‘मायक्रोबायोमे द स्टोरी अनटोल्ड’ या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषद ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान स्वायत्त महाविद्यालयात पार पडली. महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.
बांदोडकर महाविद्यालयात २००२ पासून दरवर्षी एका राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येते. ७ जानेवारी रोजी परिषदेची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोजेस कोलेट यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यानंतर परिषदेच्या सचिव डॉ. जयश्री पवार यांनी कार्यशाळा, बोधचिन्ह स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा इत्यादींचा थोडक्यात आढावा घेतला. परिषदेच्या उदघाटन प्रसंगी एमेरिटस शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी बीजभाषणात मायक्रोबायोमच्या विविधतेबद्दल तसेच मायक्रोबायोमचे मानवी शरीरावर होणारे परिणाम याबद्दल त्यांच्या चमूने केलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी परिषदेत उपस्थित असलेल्यांच्या शंकांचेही निरसन केले. परिषेदेच्या दुसऱ्या दिवशी तोंडी सादरीकरणाची स्पर्धा पार पडली असून यात सहभागी झालेल्यांनी आपले संशोधन सादर केले. संबंधित स्पर्धेचे परीक्षण डॉ. अश्विन कोटनीस, डॉ. लिली जैन यांनी केले. परिषदेच्या समारोप प्रसंगी सीएसआयआर नागपूर माजी विभाग प्रमुख यांनी डॉ. हेमंत पुरोहित, डॉ कल्पिता मुळ्ये आदि उपस्थित होते.
संशोधनपर विषयावर चर्चा
७ आणि ८ जानेवारी दरम्यान झालेल्या या परिषदेत अनेक नामांकित संस्थेतील संशोधकांनी संशोधनपर विषयावर चर्चा केली. यात सहाय्यक प्रा. अश्विन कोटनीस यांनी जैवरसायनशास्त्र विभाग एम्स भोपाल, यांनी मायक्रोबियल डिसबयोसीस, डॉ. नवीन अरोरा पर्यावरणशास्त्र विभाग, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लखनऊ यांनी ‘ॲप्लिकेशन ऑफ पीजीपीआर इन बायोरेमिडिएशन ऑफ सॅलियन सॉईल इन यूपी’ यावर त्यांचे संशोधनपर विचार मांडले. तर डॉ. अनिलकुमार, जनुक नियमन प्रयोगशाळा यांनी ‘अप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोमी डीराइवड मेटबॉलिक इन प्रोगोनिसिस अँड डिग्नोसीस ऑफ डिस्क्लोज’ या विषयावर तसेच डॉ. शिल्पा वरेकर पार्ले ग्रो प्रायव्हेट लि. यांनी ‘रोल ऑफ केरेटेनोपोलीक फंगी इन इकोसिस्टिम फंगशनिंग अँड प्रोडक्शनऑफ इंडस्ट्रीयली इम्पॉर्टन्ट सेकंडरी मेटाबोलि’ याबाबत चर्चा केली.