विक्रमगडमधील शाळेतील
४६ विद्यार्थ्यांना कोरोना
विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील एका नामंकित शाळेत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाळेतील ४६ विद्यार्थी आणि आठ कर्मचारी अशा एकूण ५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निंबालकर यांनी दिली. बाधित विद्यार्थी १३ ते १६ वयोगटातील असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. सर्वांचे विलगीकरण करण्यात आले असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी सहा विद्यार्थिनी आहेत. सर्व विद्यार्थी सातवी, नववी आणि दहावीतील आहेत. आठ कर्मचारीही पॉझिटिव्ह आहेत. विक्रमगड सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण २३२ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४६ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व जण विलगीकरणात असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सर्वांची प्रकृती स्थिर असून, काही विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. काही विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्यावर २४ तास वैद्यकीय डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निंबालकर यांनी सांगितले.
बाधित विद्यार्थ्यांमध्ये कुठलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. तालुका आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. प्रशासन त्यांची काळजी घेत आहे, असे विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार म्हणाल्या.