मुंबईत दहावी, बारावीचे वर्गही ऑनलाईन?
शिक्षण विभागाचा पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव
मुंबई, ता. ११ : मुंबई आणि परिसरात मागील आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या परिसरातील दहावी आणि बारावीचे वर्गदेखील केवळ ऑनलाईन सुरू ठेवण्याबाबत महापालिका प्रयत्न करत आहे. यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने हे वर्ग बंद करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर केला असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सुत्रांनी दिली आहे.
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष वर्ग बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. शिक्षण विभागाने पाठवलेल्या प्रस्तावावर आयुक्तांकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याने मुंबईतील दहावी-बारावीचे सुरू असलेले वर्ग बंद होऊन त्यांचेही ऑनलाईन शिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.
दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षा, प्रात्यक्षिकांचा सराव, तोंडी आणि श्रेणी विषयांचा सराव यामुळे मुंबईत दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवण्यात आले आहेत; मात्र गेल्या काही दिवसांत शाळांमधील बरेच शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन काही शिक्षक संघटनांनीही दहावी-बारावीचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तसा प्रस्तवा शिक्षण विभागाने तयार करून तो महापालिका आयुक्तांकडे आजच सादर केला असल्याचे सांगण्यात आले आहे.