घणसोलीत वृक्षांची कत्तल
सेक्टर चारमधील प्रकार; वृक्षतोडप्रकरणी रहिवासी आक्रमक
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : घणसोली सेक्टर चारमधील एका रहिवासी सोसायटीशेजारी असणाऱ्या वृक्षांची खांडोळी अज्ञात व्यक्तींनी नियमबाह्य केली. यामुळे रहिवासी आक्रमक झाले असून, वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून गुन्हा दाखल करावे, अशी मागणी केली आहेत.
घणसोली सेक्टर चारमधील भूखंड क्रमांक ३३ वर साई पूजा हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील रहिवाशांनी जांभूळ, सीताफळ, केळी, पपई, आंबा या विविध जातींच्या रोपांची लागवड केली होती. याच सोसायटीच्या शेजारी असणारा मोकळा भूखंड विकला गेला आहे. त्याचा विकास करताना ही वृक्ष आड येत होती. यासाठी संबंधितांनी नवी मुंबई पालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांची खांडोळी केली आहे.
ज्या भूखंडाचा विकास करण्यात येणार आहे. त्या भूखंडाची सीमारेषा सिडकोकडून आखून दिली गेली होती. त्या सीमा रेषेच्या बाहेर ही वृक्ष २० ते २८ फुटांपर्यंत उंचीवर गेली होती. या सर्व वृक्षांची लागवड पाच वर्षांपूर्वी साई पूजा सोसायटीमधील नागरिकांनी केली होती. पण, रविवारचा दिवस शोधून काही व्यक्तींनी कुऱ्हाड आणि कोयत्याच्या साह्याने वृक्षांची कत्तल केल्याची माहिती स्थानिक नागरिक दिलीप पाटील यांनी दिली.
वृक्ष तोडणारे घाबरून पळाले...
वृक्षांचे तोडकाम पाहून स्थानिक नागरिक एकत्र आले आहेत. त्यांनी वृक्ष कापणाऱ्यांना पालिकेची परवानगी मागितली. त्या वेळी त्यांच्याकडे वृक्ष तोडणीची परवानगी नसल्याने हा प्रकार अंगलट येईल म्हणून तिथून पळ काढला.
कोट
वृक्षतोड करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी उद्यान सहायकांना पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच कारवाईचे आदेशही दिले आहेत.
- जयदीप पवार, उपायुक्त, उद्यान विभाग, पालिका