रोह्यासाठी १०० कोटींची पाणीपुरवठा योजना
२६ गावांची तहान भागणार; निधी देण्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे आश्वासन
रोहा, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील उजवा व डावा तीर आणि पडम ते धोंडखार, खारगाव ते कोकबन या भागातील पाणी समस्या आजही गंभीर आहे. यासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत पाणी समस्या मार्गी लावावी, अशी विनंती अर्जाद्वारे केली. याप्रसंगी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या भागातील पाणीपुरवठा योजनेसाठी तातडीने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याचे आश्वासन दिले. यामुळे २६ गावांची तहान भागणार असून लवकरच या कामाचे भूमिपूजन पाणीपुरवठामंत्री यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.
रोहे तालुक्यातील उजवा व डावा तीर या भागात पाणी समस्या गंभीर असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात तर तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. काही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केले जाते, तर अनेक ठिकाणी नागरिकांना भाड्याने वाहन करून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडलिका नदीतून पाणी आणावे लागत आहे. यासाठी या २६ गावांतील हजारो नागरिकांची पाणी समस्या दूर करा, अशी मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. पाण्याची कैफियत ऐकून पाटील यांनी जलजीवन योजनेंतर्गत हे काम लवकरच हाती घेतले जाईल. तसेच, या कामासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मिळवून देणार असल्याचे अभिवचन दिले. जलजीवन योजना गावात येणार असल्याने दळवी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यासाठी शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.
दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठामंत्री पाटील यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सल्लागार ॲड. मनोजकुमार शिंदे, चणेरा विभागप्रमुख उद्देश वाडकर, रामा शेरेकर, विकास पाटील, माजी सरपंच शिंदे, ॲड. अविनाश भगत, संदेश मोरे उपस्थित होते.