टोयोटाच्या `कॅमरी हायब्रीड`ची घोषणा
मुंबई, ता. १२ : टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आज त्यांच्या कॅमरी या लक्झरियस सेदान कारचे हाइब्रीड व्हेरिएंट लाँच करण्याची घोषणा केली. या कारच्या डिझाईनमध्ये आकर्षक बदल करून ती पुन्हा नव्या रुपात भारतीय बाजारात आणली जाणार आहे. कॅमरीची एक्स शोरूम किंमत ४१ लाख ७० हजार इतकी ठेवण्यात आली असून, संपूर्ण भारतात तिची किंमत सारखीच राहणार असल्याचे टोयोटाकडून सांगण्यात आले. कॅमरी हायब्रीड पॉवर आणि लक्झरियस सफारीचे अद्भुत मिश्रण आहे. वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या टोयोटाच्या प्रयत्नांना कॅमरी ही कार मूर्त रूप देत असल्याचे टीकेएमचे विक्री आणि विपणन विभागाचे सहायक उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले.
कॅमरी कारमध्ये २.५ लिटर, ४ सिलिंडर गॅसोलिन हायब्रीड डायनामिक फोर्स इंजिन दिले असून, जो शक्तिशाली मोटर जनरेटरच्या साह्याने १६० किलोवॅट (२१८ पीएस) ताकद निर्माण करते. या कारमध्ये स्पोर्ट, इको आणि नॉर्मल आदी ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. व्हेंटिलेटेड सीट्स, चालकाचे १० विविध पद्धतीने ॲडजस्ट होणारी सीट, ओआरव्हीएम, वायरलेस मोबाईल चार्जर, स्लाईड मून रूफ तसेच इतर अनेक फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. ही सेल्फ चार्जिंग हायब्रीड इलेक्ट्रिक सेदान कार प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सिल्वर मेटॅलिक, ग्राफाईट मेटॅलिक, रेड माईका, एटीट्यूड ब्लॅक आणि बर्निंग ब्लॅक आदी रंगांसोबतच मेटल स्ट्रिम मेटॅलिक या नवीन रंगात उपलब्ध होणार आहे.