सहावेळा कारवाईनंतरही ताडी केंद्र सुरूच. डोंबिवलीत अवैध ताडीविक्रीचा सुळसुळाट

सहावेळा कारवाईनंतरही ताडी केंद्र सुरूच. डोंबिवलीत अवैध ताडीविक्रीचा सुळसुळाट

सहा वेळा कारवाईनंतरही ताडी केंद्र सुरूच डोंबिवलीसह परिसरात अवैध ताडी विक्रीचा सुळसुळाट शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. १२ ः विषारी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. त्यातच डोंबिवलीत ताडीचे सेवन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेमुळे अवैधरित्या सुरू असणारी ताडी विक्री केंद्र आणि लोकांच्या जीवाशी त्यांचा सुरू असलेला खेळ समोर आला आहे. डोंबिवलीतील या ताडी विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा वेळा कारवाई करूनही हे अवैध ताडी विक्री केंद्र कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डोंबिवली पश्चिमेतील कोपर येथील अण्णानगर परिसरात अवैधरित्या हे ताडी विक्री केंद्र सुरू आहे. रेल्वे रुळांच्या बाजूला झाडाझुडपांमध्ये हे केंद्र गेले काही वर्षे सुरू आहे. या केंद्रावर सोमवारी (ता. १०) रात्री ताडी प्यायल्यानंतर सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके या दोघांचा मृत्यू झाला. उत्पादन शुल्क विभाग अवैधरित्या सुरू असणाऱ्या हातभट्टी दारू विक्रेते, ताडी विक्री केंद्रांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले जातात. त्यानंतरही हे अवैध केंद्र सुरूच असतात, हे डोंबिवलीतील या घटनेने उघड झाले आहे. उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्यानंतर संबंधित गुन्हा स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल होत असतो. एका परिसरात एकाच केंद्रावर सहा वेळा कारवाई होऊनही पोलिसांनी काय भूमिका घेतली, अवैधरित्या राजरोसपणे सुरू असणाऱ्या या केंद्रास नक्की कोणाचा पाठिंबा होता, असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित आहेत. डोंबिवलीतील ताडी केंद्र - डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात २२ ताडी विक्री केंद्र वैधरित्या सुरू आहेत. - ताडी केंद्राला परवाना आवश्यक असताना तो न घेताच अनेक केंद्र सर्रास सुरू - डोंबिवली टेकडी परिसर, खाडी किनारी भाग, झोपडपट्टी परिसरात हातभट्टी दारू निर्मिती व ताडी केंद्र. रसायनमिश्रित ताडी विक्री नशा करण्यासाठी रसायनमिश्रित ताडी बनविण्याचे प्रकार वाढले आहेत. संबंधित रसायन पाण्याच्या टाकीत टाकून त्यात तांदळाच्या भाताची पेज, युरिया खत असे मानवी शरीरास घातक असलेले पदार्थ एकत्रित केले जातात. एक लिटर रसायनापासून सुमारे ५० लिटर ताडी तयार केली जाते. यामुळे रसायन माफियांचे देखील चांगलेच फावले आहे. आता तर लिक्विडऐवजी छोट्या बटणाच्या आकाराच्या गोळ्या टाकल्या जातात. कोपरगाव येथील ताडी विक्री केंद्र अवैधरित्या सुरू होते. २०१८ पासून त्यावर सहा वेळा कारवाई करण्यात आली आहे. त्याचा अहवाल प्रांत, उप दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला गेलेला आहे. यापूर्वी रवी बथनीचा भाऊ हे केंद्र चालवित होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. २८ डिसेंबरला या केंद्रावर शेवटची कारवाई करण्यात आली होती. - अनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com