शहापूर-किन्हवली रस्त्यावरील अपघातात नीलगाय, दुचाकीस्वार ठार
किन्हवली, ता. १२ (बातमीदार) ः शहापूर-किन्हवली रस्त्यावरील उंभ्रईजवळ जंगली नीलगायीला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये नीलगायीचा जागीच मृत्यू झाला; तर दुचाकीस्वाराचे किन्हवली येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना निधन झाले. हा अपघात आज सकाळी साडेअकरा वाजता झाला.
अपघातामध्ये निधन झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव पंढरी बुधा वाघ (२०) असे आहे. तो डोळखांब परिसरातील जांभुळवाड येथील रहिवासी होता. पंढरी आपल्या पल्सर दुचाकीवरून किन्हवलीकडे जात होता. तेव्हा अचानक रस्त्यावर नीलगाय आली. पंढरी यांना गाडीवर नियंत्रण न मिळवता आल्याने त्यांच्या दुचाकीने नीलगायीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा गंभीर होता की नीलगायीचा जागीच मृत्यू झाला; तर दुचाकीस्वार पंढरी वाघ गंभीर जखमी झाला. त्याला किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
बेडीसगाव ते उंभ्रईदरम्यान गतिरोधकाला मान्यता मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच या दरम्यान नीलगायींचा वावर असल्याचे सूचना फलक लावण्यात येतील.
- दर्शन ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी धसई, शहापूर वनविभाग.