मुलांच्या लसीकरणात मुंबई मागे

मुलांच्या लसीकरणात मुंबई मागे

मुलांच्या लसीकरणात मुंबई मागे आतापर्यंत केवळ ९३ हजार जणांना पहिला डोस सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : देशभरासह मुंबईत तीन जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे; मात्र मुंबईत अद्याप मुलांच्या लसीकरणाला इतर शहरांच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईत आतापर्यंत ९३ हजार ६७२ लहान मुलांचे लसीकरण झाले आहे. त्या तुलनेत पुण्यात आतापर्यंत तब्बल दोन लाख मुलांचे लसीकरण झाले आहे. मुंबईत अनेक पालक आपल्या मुलांना लसीकरणासाठी कोविड जम्बो सेंटरमध्ये पाठवण्यास घाबरत आहेत. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेत अडथळा येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यात १५ ते १७ वयोगटातील सर्वाधिक लसीकरण पुण्यात झाले आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार, तीन जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजेच अवघ्या नऊ दिवसांत पुण्यात २ लाख ८ हजार ३०९ मुलांचे लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ १ लाख ९४ हजार ४४० मुलांचे लसीकरण ठाणे जिल्ह्यात झाले आहे. त्यानंतर अहमदनगरमध्ये १ लाख २५ हजार, नाशिकमध्ये १ लाख २२ हजार ४०२ आणि कोल्हापूरमध्ये १ लाख १ हजार ८८२ मुलांचे लसीकरण झाले आहे. मुंबईत लसीकरणासाठी ६ लाख १२ हजार मुले पात्र आहेत. त्यासाठी १० प्रमुख केंद्रावर पालिकेतर्फे मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढावा आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेपासून मुलांचा बचाव व्हावा, यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलांसाठी लसीकरण शिबिरे घेण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. प्रोजेक्ट इंडिया या संस्थेच्या मदतीने शाळा-महाविद्यालयांच्या आवारात लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढून मुंबई लवकरच एक लाख मुलांच्या लसीकरणाचा टप्पा पार करेल, अशी पालिकेला आशा आहे. शाळा, महाविद्यालयांतही लसीकरण सुरू करणार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत मुलांच्या लसीकरण केंद्रांची संख्या कमी असल्याने लसीकरणात मुंबई मागे आहे. कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी मुलांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केल्याने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली नव्हती; मात्र इतर जिल्ह्यांत मुलांवर काहीही परिणाम झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे मुंबईतही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com