ताडी विक्रेत्याला नवी मुंबईत ठोकल्या बेड्या
परराज्यांत पळून जाण्याचा डाव फसला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः ताडीचे अतिसेवन केल्याने डोंबिवलीतील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. याप्रकरणी ताडी विक्रेता रवी बाथणी याच्याविरोधात मंगळवारी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस रवीचा शोध घेत होते. परराज्यांत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या रवीला विष्णूनगर पोलिसांनी नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली.
डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव येथील अण्णानगर परिसरात रवी बथनी (वय ३८) हा ताडी विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्री त्याच्या ताडीविक्री केंद्रावर स्वप्निल चोळखे आणि सचिन पाडमुख या तरुणांनी ताडीचे सेवन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी सकाळी विष्णूनगर पोलिस ठाण्यात ताडी विक्रेता रवी बथनी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ताडी विक्री केंद्राच्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. मात्र त्या आधीच रवी तेथून फरारी झाला होता. पोलिसांनी तत्काळ त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली होती.
तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गुन्हे राहुल खिलारे, पोलिस उपनिरीक्षक के. व्ही. मोरे, पोलिस हवालदार पाटणकर, शिपाई भामरे यांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो परराज्यांत पळून जाण्याच्या तयारीत असतानाच कळंबोली सेक्टर १४ येथून त्यास अटक केली.