सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा शिरकाव
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) ः मागच्या आठवड्यात अंबरनाथ ऑडन्स कंपनीला लागून असलेल्या जंगलात एक बिबट्या सीसी टीव्हीत कैद झाला होता. आता या बिबट्याने उल्हासनगरातील सोंग्याच्या वाडीत शिरकाव केला आहे. सुभाष टेकडी रोडवर अंबरनाथजवळील वालधुनी नदीच्या काठावर ही सोंग्याची वाडी आहे. जंगल आणि शेकडोंच्या संख्येने झाडे असलेल्या या वाडीचा परिसर १० ते १५ एकराचा आहे. काल (मंगळवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेल्या भरत नगरातील एका मुलीला हा बिबट्या दिसला. वाऱ्यासारखी ही बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाचे अधिकारी प्रमोद ठक्कर, प्रमोद वारके, दिनेश मल्होत्रा यांनी विठ्ठलवाडी पोलिस, काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष विशाल सोनवणे, निर्भय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधीर बागुल आदी समाजसेवकांसोबत काल रात्री उशिरापर्यंत या बिबट्याचा शोध घेतला आहे. दरम्यान, आज सकाळी पुन्हा वन विभागाचे पथक सोंग्याच्या वाडीत दाखल झाले असून त्यांना तीनचार ठिकाणी पंजाचे ठसे दिसले आहेत. या ठश्यांचे फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यात येणार असून त्याची खात्री झाल्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे आणले जाणार आहेत.
स्थानिक नगरसेवक व गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे सभापती प्रमोद टाले यांनी उल्हासनगर तालुका वन विभागाचे मुख्य अधिकारी प्रमोद ठक्कर यांना पत्र पाठवले आहे. सोंग्याच्या वाडीत दोन डुकरे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते पाहता वाडीत बिबट्या असण्याची दाट शक्यता असून त्यासाठी त्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.