घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावर उपहारगृहांमुळे कोंडी
मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) ः घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यालगत शिवाजीनगर येथील विविध उपहारगृहे आणि टी-स्टॉल वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील वाहतूक कोंडी उड्डाणपुलामुळे कमी झाली आहे. या उड्डाणपुलावर दुचाकी व अवजड वाहनांना प्रवेश नाही. पीएमजीपी वसाहत, म्हाडा वसाहत, मोहिते-पाटील नगर, मंडाळा झोपडपट्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर, बैंगनवाडी व शिवाजी नगर परिसरातील वाहनांना या पुलावर प्रवेश करता येत नाही. त्यामुळे या मार्गावर वाहनांची कायम रहदारी सुरूच असते. शिवाजीनगर जंक्शन येथे ही वाहने तसेच शिवाजीनगर, गोवंडी स्थानक व पी. एल. लोखंडे मार्गाकडून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. त्या ठिकाणी असलेल्या सिग्नलमुळे वाहनचालकांना थांबावे लागते. घाटकोपरच्या दिशेला याच सिग्नललगत सलग उपहारगृहे, चहाची दुकाने व बसथांबा आहे. या उपहारगृहात आलेल्या खवय्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. बऱ्याचदा एकच मार्गिका वाहनांना जाण्यासाठी उघडी असते. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा परिणाम चौकातील वाहतुकीवर होतो. त्यामुळे सर्वच रस्त्यावरील वाहतूक मंदावते. खवय्यांच्या वाहनांमुळे इतर चालकांची डोकेदुखी वाढते. खवय्यांची वाहने त्या ठिकाणी उभी करण्यास मनाई केल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, असे चालकांचे मत आहे.
...
या उपहारगृहांसमोर वाहने उभी करणाऱ्यांविरोधात वारंवार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच समज देण्यात आली आहे. त्या वाहनचालकांविरोधात पुन्हा कडक कारवाई करण्यात येईल.
- मोहन माने, वरिष्ठ निरीक्षक, देवनार वाहतूक पोल्स ठाणे
...