नावडा फाटा उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
दररोजच्या वाहतूक कोंडीतून चालकांची सुटका
पनवेल, ता. १२ (प्रतिनिधी) : तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नावडा फाटा येथे दररोज होणारी वाहतूक कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी केलेल्या अंडरपासच्या मागणीवर तोडगा काढण्यात आल्याने उड्डाणपुलाचे रखडलेले काम येत्या दीड ते दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती उड्डाणपुलाचे काम पाहणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एमएमआरडीएच्या माध्यमातून नावडा फाटा येथे २०१७ मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. नावडे वसाहत व गावातील नागरिकांनी मोठी वाहनांसाठी अंडरपास बनवून देण्याची मागणी केल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले होते. शिक्षक आमदार व स्थानिक शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केलेल्या मध्यस्थीतून एमएमआरडीए अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मागणीवर अखेर तोडगा काढण्यात आला. आणि अंडरपासचे काम पूर्ण झाले. त्यानंतर उड्डाणपुलाचे रखडलेले काम मार्गी लागले असून येत्या दोन महिन्यात पूल सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नावडा फाटा येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
..........
एमएमआरडीएने घेतलेल्या निर्णयानुसार डिसेंबर २०१७ मध्ये टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी विकसक कंपनीच्या माध्यमातून ९७३ मीटरच्या तीन पदरी उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. कंत्राटदार कंपनीकडून सुरू असलेले हे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे.