सहवासितांच्या शोधासाठी स्वतंत्र पथक
पालिकेकडून २४ तासांत ४५ हजार व्यक्तींचा शोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महापालिकेने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ४५ हजार व्यक्तींचा शोध अवघ्या २४ तासांत घेतला, तर अतिजोखमीच्या ५४२ जणांना कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक तयार केले आहे. कोरोना संशयितांच्या विलगीकरणासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागांत दोन केंद्रांसाठी जागा निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेपासून महापालिकेने चाचणी, उपचार आणि विलगीकरण या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. सध्या ओमिक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या निकट सहवासित व्यक्तींना बाधा होण्यापासून तसेच त्यांच्यापासून इतरांना बाधा होण्याचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेने त्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथक तयार केले आहेत. या पथकामार्फत बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोधून त्यांचे विलगीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. गेल्या २४ तासांत पालिकेने ४५ हजार ६५० जणांचे विलगीकरण केले आहे. त्यातील ५४२ जणांना कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
--
संशयितांची चाचणी
बाधित व्यक्ती आढळल्यावर त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना कोविडसदृश लक्षणे असल्यास त्यांचीही अँटिजेन चाचणी केली जाते, तसेच ज्या घरात गृहविलगीकरण शक्य नाही, त्याचे कोविड केंद्रात विलगीकरण केले जात आहे.