पाणी शुद्धतेची तपासणी महिला करणार
जलजीवन मिशनतर्फे प्रशिक्षणाला सुरुवात
पालघर, ता. १२ (बातमीदार) ः जिल्ह्यातील प्रत्येक महसूल गावात शाश्वत शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. आता पाणी शुद्धतेची तपासणी गावातील महिला स्वत: करणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ८८६ महसूल गावांत प्रत्येकी पाच महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ हजार ७२७ पाणी स्रोतांची तपासणी होणार आहे.
जलजीवन मिशन या योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. शरीरात शुद्ध पाणी गेले तरच आरोग्य चांगले राहते. पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एक किट खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये २० मिली लहान काचेची बाटली आहे. या बाटलीमध्ये स्रोताचे पाणी भरून सामान्य तापमानात ४८ तास ठेवावे लागणार आहे. या बाटलीतील पाण्याचा रंग आहे तसाच राहिला तर ते पिण्यास योग्य आहे. बाटलीतील पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यास अयोग्य आहे हे स्पष्ट होणार आहे.
प्रत्येक गावातील ५ महिलांचे प्रशिक्षण
या महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांची तपासणी होणार आहे. तपासणी झाल्यानंतर त्याच्या अहवालाची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतीमधील डेटा एन्ट्री ऑपरेटर घेणार आहेत. पाण्याची तपासणी करण्यासाठी नमुना घेताना महिला प्रत्यक्ष पाण्याच्या स्रोताजवळ जाणार आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास ग्रामपंचायतीला कळवून स्रोतांची स्वच्छताही करून घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन विभागाकडून देण्यात आली.