येऊरच्या धबधब्यातून ठाणेकरांना मिळणार पाणी
हुमायून व पांडव धबधब्यावर जलसंधारण विभाग बांधणार बंधारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः पर्यटकांचे आकर्षण असलेले निसर्गरम्य येऊरच्या जंगलातील धबधबे आता ठाणेकरांची तहान भागवण्यासाठी उपयोगात येणार आहेत. येथे बारमाही वाहणाऱ्या हुमायून व पांडवकडा धबधब्यांमधील पाणी अडवून तेथे जलसंधारण विभाग बंधारा बांधणार आहे. हा बंधारा झाल्यास साडे तीन एम. एल. डी. पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येऊर तसेच परिसराची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
ठाणे शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडे स्वतःचे धरण नाही. त्यामुळे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ११० एम.एल.डी., एम.आय.डी.सी.कडून ११० एम.एल.डी., पिसे धरणातून २०० एम.एल.डी., तर मुंबई महापालिकेकडून ६५ एम.एल.डी. असा एकूण ४८५ एम.एल.डी. एवढा पाणीपुरवठा घ्यावा लागतो. तरी देखील हे पाणी अपुरे पडते. दुसरीकडे येऊर येथील हुमायून तसेच पांडवकडा हे दोन्ही धबधबे बारमाही वाहत असतात. त्याचा उपयोग करून पाणी अडवले तर निश्चित फायदा होईल. यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन पूर्वीच्या सरकारला प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो मंजूर झाला नाही. येथील धबधब्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा योग्य वापर करता येईल यासाठी प्रताप सरनाईक यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. त्याला आता यश आले आहे.
धबधब्यांवर अशा प्रकारचा बंधारा बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार आज ( ता.१२) जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी मिलिंद पालवे, महापालिकेचे उपअभियंता कुलकर्णी यांना सोबत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी येऊर येथील एअरफोर्स स्टेशनजवळील हुमायून बंधारा व पाटोणा पाडा येथील भेंडी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. हुमायून धबधब्याच्या माध्यमातून अंदाजे दीड एमएलडी तर पांडवकडा धबधब्यातून दोन एमएलडी एवढे पाणी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या धबधब्यांवर बंधारे बांधण्यासाठी अंदाजे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
------------
वन्य प्राण्यांची तहान भागणार
या धबधब्यावर बंधारा झाल्यानंतर येथे वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा येऊरच्या वन्य प्राण्यांनाही होणार आहे. अनेक वेळा पाण्याच्या शोधात बिबट्या तसेच अनेक हिंस्त्र प्राणी शहराकडे धाव घेतात. पण हा बंधारा झाल्यास वन्यजीवांना ३६५ दिवस पाणी मिळणार आहे. परिणामी त्यांना शहरात येण्याची गरज भासणार नाही.