पनवेलमधील घरे गिरणी कामगारांनाच मिळणार
विजेत्यांकडून घराची रक्कम घेण्यास म्हाडाकडून सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पनवेलमधील कोन येथील घरांच्या सोडतीत विजेते ठरलेल्या गिरणी कामगारांना त्यांनी भरलेली रक्कम परत करून
मुंबईत घर देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यामुळे गिरणी कामगार संघटनांनी गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेऊन घराची रक्कम भरलेल्या कामगारांना पनवेल येथेच घरे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाने विजेत्यांकडून घराची रक्कम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना दिलासा मिळाला आहे.
एमएमआरडीएने पनवेल येथे उभारलेली घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर म्हाडामार्फत २०१६ मध्ये २ हजार ४१७ घरांची सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर म्हाडाने पात्र कामगारांकडून घराची संपूर्ण रक्कम घेतली; मात्र घराचा ताबा म्हाडा देणार की एमएमआरडीए देणार यावरून वाद सुरू होता. कामगार संघटनांकडून विजेत्या कामगारांना घरांचा ताबा देऊन दुसऱ्या टप्प्यातील घरांची सोडत काढण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी संघटनांनी आंदोलनही केले होते. मात्र नंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी गिरणी कामगारांना मुंबईत घर देण्याचा निर्णय जाहीर करत पनवेल येथील सोडतीमधील विजेत्यांकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत करणार असल्याची घोषणा केली; मात्र विजेत्या कामगारांना पनवेल येथेच घराचा ताबा द्यावा, अशी मागणी गिरणी कामगार कृती समितीचे नेते प्रवीण घाग यांच्यासह विविध नेत्यांनी केली होती. त्याप्रमाणे म्हाडाने पनवेल कोन येथील सोडतीमधील विजेत्यांकडून घराची रक्कम घेण्यास सुरुवात केली असल्याचे घाग यांनी सांगितले. म्हाडा अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.