कोविड केंद्रात अस्वच्छतेचा कळस
शिल्लक अन्नावर श्वानांचा ताव; ट्विटमुळे प्रशासनाची पळापळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कोविड केंद्रांच्या हाऊस किपिंगसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे; मात्र या केंद्रातील शौचालयात अस्वच्छता तर आहेच, त्याचबरोबर केंद्राच्या बाजूला टाकलेल्या पत्रावळ्यांवर श्वान ताव मारत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
आयआयटीचे प्राध्यापक अमित सेठी हे दोन दिवसांपूर्वी गोरेगाव येथील कोविड केंद्रात दाखल झाले आहेत. त्यांनी या केंद्राच्या शौचालयासह इतर ठिकाणच्या अस्वच्छतेचे छायाचित्र ट्विट केले. शौचालय अस्वच्छ असण्यासोबतच रुग्णांचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या पत्रावळ्या कोविड केंद्राच्या बाजूच्या कचऱ्याच्या डब्यात टाकल्या जातात; मात्र हा डबा भरल्यानंतर बाहेर पडलेल्या पत्रावळ्यांवर भटके श्वान ताव मारत असल्याचे छायाचित्र सेठी यांनी ट्विट केले. जणू काही आपण तुरुंगात असल्याचे सांगत सेठी यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, अमित सेठी यांनी महापालिकेला टॅग करत हे ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटनंतर प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. तत्काळ या केंद्राच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आणि त्याचे छायाचित्रही पालिकेने उत्तरादाखल ट्विट केले. तसेच या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत ही चूक असल्याचे पालिकेने मान्य केले.