डीव्ही मोटार गैरप्रकाराची सात तास चौकशी
‘सकाळ’च्या वृत्तानंतर पाच अधिकाऱ्यांकडून तपास
प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : शासकीय परिवहन विभागातील जीटीएस नियंत्रकांकडून करण्यात आलेल्या डीव्ही मोटारींच्या गैरप्रकाराचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी(ता. १२) राजशिष्टाचार विभागाचे चांगलेच धाबे दणाणले. गेल्या दोन महिन्यांपासून कागदावरच असलेल्या चौकशीला अखेर सुरुवात झाली. मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांनी वरळीतील शासकीय परिवहन सेवा कार्यालयात सात तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य अतिथींच्या वाहनांसंदर्भात केल्या जात असलेल्या निष्काळजीपणावर मुख्यमंत्री कार्यालयाने राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर बुधवारी मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांनी वरळी येथील जीटीएस कार्यालयात येत चौकशीला सुरुवात केली. दरम्यान, डीव्ही मोटारींच्या करण्यात आलेल्या नोंदी आणि तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांनी दिलेला खुलासा तपासण्यात आला. शिवाय गायकर यांनी परवानगी नसताना राज्य अतिथींच्या वाहनांचा करण्यात आलेल्या गैरवापराचे तथ्य शोधण्यात आले असून त्यासंबंधीची कागदपत्रे गोळा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
----
गायकरांच्या कार्यकाळाची चौकशी होणार
दरम्यान, डीव्ही मोटार प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी पथकामध्ये शासकीय परिवहन सेवेच्या नियंत्रक क्रांती पाटील, उपसचिव अशोक साळवे, सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार कक्ष अधिकारी अभय भंडारी, कक्ष अधिकारी कुलकर्णी, अवर सचिव शिरीष गोडबोले यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये आढळून आलेली कागदपत्रे जप्त केली. तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर शासकीय परिवहन सेवेत ५ मे २०१९ रोजी रुजू झाले. त्यानंतर डिसेंबर २०२१ नंतर पदोन्नतीवर गेले. यादरम्यानच्या दोन वर्षांतील कालावधीची तपासणी या अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
----------