शिक्षण विभागाला लवकरच
मिळणार नवे प्रधान सचिव
मुंबई, ता. १२ : शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांची पुढील महिन्यात मुदत संपत असल्याने राज्याला लवकरच नवीन शिक्षण सचिव मिळणार आहेत. या पदासाठी तब्बल अर्धा डझनहून अधिक सनदी अधिकाऱ्यांनी आपली इच्छा दर्शवली असल्याने फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत शिक्षण विभागाला नवीन प्रधान सचिव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वंदना कृष्णा या निष्क्रिय सचिव असल्याचा आरोप करत शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही त्यांच्या हकालपट्टी करून त्यांच्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम, शैक्षणिक गुणवत्तावाढ आदींसाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना आणि नवीन कार्यक्रम देण्यासाठी त्या अपयशी ठरल्याचे सांगत शिक्षक आमदार गाणार यांनी तर राज्यपालांकडेही याविषयीची एक तक्रार नोंदवली होती. मात्र आता वंदना कृष्णा यांची मुदतच संपत आल्याने अनेक अधिकाऱ्यांनी शिक्षण सचिवपदी येण्याची आपली इच्छा व्यक्त केली असून काही अधिकाऱ्यांनी आपली लॉबिंगही सुरू केली असल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.