कांबे गावाच्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेसाठी निधी द्या
पंचम कालानी यांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना साकडे
उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) ः दिवंगत आमदार ज्योती कलानी यांनी कांबा गावाला पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांना त्यात यश आले. पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, पाणी शुद्धीकरण यंत्रणेचे काम अपूर्ण आहे. या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी कमी पडत आहे. या निधीची तरतूद करण्यात आली तर नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा, माजी महापौर पंचम कालानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. जयंत पाटील यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
याव्यतिरिक्त उल्हासनगर शहराला एमआयडीसीच्या शहाड पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा होत आहे. त्याबदल्यात पालिका दर महिन्याला एमआयडीसीला पाण्याचे बिल देत आहे. त्या अनुषंगाने सदर पंपिंग हे पालिकेकडे हस्तांतरित केल्यास त्याचा फायदा पालिकेला होईल, त्यामुळे पंपिंगचे हस्तांतरण करण्यात यावे, अशी मागणी देखील पंचम कालानी यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली. यावेळी कांबा गावच्या सरपंच भारती भगत, राष्ट्रवादीचे युवानेते कमलेश निकम आदी उपस्थित होते.