संत जोजेफ पतसंस्थेच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा
विरार, ता. १५ (बातमीदार) ःवसईमधील थकीत कर्ज प्रकरणात गहाण असलेल्या जमिनीवरील बोजा कमी करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी येथील संत जोजेफ क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष, प्रबंधकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहनिबंधकांनी दिले होते.
एका कोट्यवधी गहाण कर्जप्रकरणी संस्थेकडे गहाण असलेली जमीन मिळकत कर्जदाराशी परस्पर संगनमत करून खोटे दस्तावेज बनवून संस्थेचे कर्ज येणे बाकी असताना संस्थेच्या नावे असलेला ७/१२ वरील बोजा कमी करून त्याची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी संस्थेचे जागृत सभासद लिनस डिकुना व रॉकी गोन्साल्वीस यांनी विभागीय सहनिबंधक कोकण भवन येथे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने चौकशी सुरू होऊन २०१७ साली कर्जदार व बँकेचे अध्यक्ष व्हॅलिरियन गोन्साल्विस व तत्कालीन प्रबंधक पीटर फर्नांडिस यांच्यावर गुन्हा दाखल करायचे आदेश प्राप्त झाले होते. याप्रकरणी व्हॅलिरियन गोन्साल्वीस आणि फर्नांडिस यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले होते. त्यावर मंत्र्यांनी सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. याप्रकरणी पुन्हा सहनिबंधकांकडे सुनावणी पार पडली. त्यात डिकुना यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून आपली बाजू मांडली होती. तेव्हा सदर प्रकरण अंगाशी येईल याची जाणीव झालेल्या चेअरमन गोन्साल्विस यांनी पतसंस्थेमार्फत कर्जदाराविरोधात वसई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी व्हॅलिरियन गोन्साल्विस यांना फिर्यादी बनवून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदाराविरोधात गुन्हा दाखल केला होता. गोन्साल्विस प्रकरणाला बगल देत असल्याने डिकुना आणि गोन्साल्विस यांनी सतत पाठपुरावा करून सदर प्रकरणी कर्जदार, बँक अध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याचे पुरावे सादर केले होते. त्याची दखल घेत सहनिबंधकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वसई पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.