नवी मुंबईत कोरोनायोद्धांना प्रिकॉशन डोस
१९२ आरोग्यकर्मी व पहिल्या फळीतील
वाशी, ता. १३ (बातमीदार) ः केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योद्धे तसेच सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस देण्यास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबध्दरित्या सुरुवात केली आहे. दोन दिवसात १,७९१ पात्र लाभार्थ्यांनी कोविड प्रिकॉशन डोसचा लाभ घेतलेला आहे.
बुधवारी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये आरोग्यकर्मी व पहिल्या फळीतल कोरोना योद्धे यांच्याकरिता प्रिकॉशन डोस देण्याकरिता विशेष सत्र आयोजित केले होते. सकाळपासूनच लसीकरण सत्राला अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. १३ एप्रिल २०२१ रोजी व त्यापूर्वी कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेल्या १९२ आरोग्यकर्मी व कोरोना योद्धांचे विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. यामध्ये २६ आरोग्यकर्मी तसेच १६६ पहिल्या फळीतील कोरोनायोद्धे यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
कोविडपासून अधिक संरक्षणाच्या दृष्टीने आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिकांना ‘प्रिकॉशन डोस’ दिला जात असून लाभार्थ्यांनी योग्य वेळेत प्रिकॉशन डोस घ्यावा. डोस घेतल्यानंतरही मास्क वापर आणि कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करावे.
- अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका