आजपासून साहित्य जागर
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरू; ‘साहित्य सेतू’चे डिजिटल कार्यक्रम
मुंबई, ता. १३ ः मराठी भाषेची समृद्धी साजरी करण्यासाठी, मराठी भाषेचा महिमा सर्वदूर पोहोचवण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केला जातो. या निमित्ताने मराठी साहित्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले जातात. या वर्षी उद्यापासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था या संस्थांतर्फे ‘साहित्य सेतू’ या डिजिटल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ ते २८ जानेवारी २०२२ या कालखंडात दररोज संध्याकाळी ४ वाजता राज्य मराठी विकास संस्था, तसेच मिती ग्रुप या फेसबुक पेजेसवरून आणि यू-ट्युब चॅनेलवरून हे कार्यक्रम प्रदर्शित केले जातील. या कार्यक्रमांच्या माध्यमातून या वर्षी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील निवडक कलाकृतींचा डिजिटल वाचन कट्टा या निमित्ताने तयार होणार आहे. कार्यक्रमात कथा, कादंबरी, नाटक, विनोदी साहित्य, विज्ञानवादी साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश असणार आहे. या प्रत्येक साहित्य प्रकारातील काही निवडक कलाकृतीचं वाचन कार्यक्रमात केले जाणार आहे. यंदाचं हे वर्ष म्हणजे कविवर्य वसंत बापट आणि कवयित्री शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणूनच या दोन्ही कलाकारांच्या साहित्याकृतींवर आधारित कार्यक्रमांचा समावेशदेखील पंधरवड्यात करण्यात आला आहे.
...
भाषा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पंधरवड्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमात ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’ याविषयी अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे आणि समन्वयक, प्रा. हरी नरके चर्चा करतील.
...
नामवंतांचा समावेश
या कार्यक्रमांमध्ये लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आणि लेखिका डॉ. तारा भवाळकर, नृत्यांगना झेलम परांजपे, लेखिका, सानिया, कवी व अभिनेता, किशोर कदम, कवी व गीतकार, गुरू ठाकूर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक, आशुतोष जावडेकर, गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, अभिनेत्री, तेजश्री प्रधान अशी अनेक मान्यवर लेखक, कवी, कादंबरीकार आणि कलाकार मंडळी सहभागी होतील.
...