सेमीकंडक्टर शॉर्टेजमुळे वाहनांच्या प्रतीक्षेत वाढ
कार डिलर्ससवर वाहन बुकिंगची रक्कम परत करण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अनेक जण कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी नवे वाहन विकत घेण्याचे नियोजन करतात, मात्र सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे या वाहन खरेदीच्या नियोजनावर पाणी फेरले आहे. बुकिंग करूनही नवे वाहन मिळणे कठीण झाले आहे. काही वाहनांसाठी वर्षभर वाट पाहावी लागत असल्यामुळे अनेकांनी वाहन खरेदी टाळली आहे. त्यातच कोरोना लाटेच्या धास्तीने परिस्थिती अधिकच बिकट होण्याची भीती मनात दाटली आहे. यंदा आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांच्या विक्रीवर सेमीकंडक्टर तुटवड्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हाताशी आलेली बुकिंग रद्द करण्याची वेळ वाहन शोरूम मालकांवर आली आहे.
नेरूळमध्ये राहणारे अल्पेश पडवळ हे गेल्या काही वर्षांपासून टॅक्सी व्यवसायात आहेत. दुसऱ्या कोरोना लाटेनंतर वाहतूक व्यवसायाला उठाव मिळू लागल्यामुळे, जुनी सीएनजी कार विकून नवी कार विकत घेण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यांनी आपली जुनी गाडी विकून टाकली, मात्र प्रत्यक्ष शोरूममध्ये गेल्यावर, नवी कार हाती येण्यासाठी १० महिन्यांपर्यंतचा कालावधी लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्यांना कारखरेदीचा निर्णय रद्द करावा लागला. पहिली गाडी विकून मिळालेले पैसेही खर्च होतील ही चिंता त्यांना सतावत आहे.
...
कार मिळत असल्यास बुकिंग
नव्या वाहनांसाठी बुकिंगचे पैसे देऊन वर्षभर थांबण्याची ग्राहकांची मानसिकता नसते. कार मिळत असल्यास बुकिंग करणार, अशा अटी ठेवूनच ग्राहक वाहन खरेदी करत आहेत. त्यामुळे वाहन विक्री करताना ग्राहकांच्या असल्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे डिलर्सनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
...
पैसे परत मिळवले
दुसऱ्या कोविड लाटेपूर्वी नवी मुंबईतील संदेश चौधरी यांनी गाडी बुक केली. मात्र कोरोना लाट सुरू झाल्यानंतर शोरूम बंद झाले. त्यामुळे संदेश यांना सहा महिने गाडीच मिळाली नाही. परिणामी त्यांनी डिलरकडे तगादा लावून बुकिंगचे पैसे परत मिळवले. पैसे परत मिळाले, मात्र त्या काळात व्यवसायाचे माझे नियोजन बिघडले, असे संदेश चौधरी यांनी सांगीतले.
....
वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकलला
दिलीप भोपी यांना पांढऱ्या रंगाची कार खरेदी करायची होती. मात्र त्यांनी मुंबईसह सर्व शोरूमकडे चौकशी केली. मात्र एकाही वाहन विक्रेत्याने लवकरच आणि नियोजित मुहूर्तावर वाहन देण्याची हमी दिली नाही. प्रत्येकाने वर्षभर थांबावे लागेल, असेच कळवले. अनेकांनी तर वाहन मिळेल, मात्र रंग सांगता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे दिलीप भोपी यांनी अखेर वाहन खरेदीचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे.
....