जलबोगद्याच्या
५२६ मीटरचे काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : चेंबूर येथील अमर महाल ते परळपर्यंतच्या जलबोगद्याचे महिनाभरात ५२६ मीटरचे खोदकाम करण्यात महापालिकेला यश आले आहे. अमर महाल ते परळ आणि अमर महाल ते ट्रॉम्बेपर्यंतच्या जलबोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी १०० किलोमीटर लांबीचे जलबोगदे असलेले जगातील दुसरे शहर ठरणार आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात १०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे जलबोगदे आहेत.
जलवाहिन्यांना लागणाऱ्या गळतीमुळे महापालिकेने गेल्या काही वर्षांत भूमिगत जलबोगदे बांधण्यास सुरुवात केली आहे. अमर महाल ते परळ या ९.६७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्यासह अमर महाल ते ट्रॉम्बे या ५.५२ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे काम सुरू आहे. ६ मार्च २०२१ रोजी ट्रॉम्बेपर्यंतच्या जलबोगद्याचे काम सुरू झाले. आता २.७५ किलोमीटर लांबीचे खणन पूर्ण झाले असून हे संपूर्ण काम २०२४ मध्ये संपणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली; तर परळपर्यंतच्या बोगद्याचे काम २०२१ च्या अखेरीस सुरू झाले. अवघ्या एका महिन्यात ५२६ मीटरचे खोदकाम करण्याचा विक्रम महापालिकेने केला आहे. हा जलबोगदा २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.
मुंबईत आतापर्यंत विविध ठिकाणी ८५ किलोमीटरहून अधिक लांबीचे जलबोगदे बांधण्यात आले आहेत. हे दोन्ही बोगदे पूर्ण झाल्यावर १०० किलोमीटर लांबीचे जलबोगद्याचे जाळे तयार होणार आहे.