लशीचा परिणाम होतोय कमी ?
लसीकरण झालेल्यांमध्येही ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाण
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्येही कालांतराने अँटीबॉडीजची कमतरता होऊ लागली आहे. यासाठी आता बूस्टर डोसची आवश्यकता भासू लागली आहे. मुंबईत पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गेल्या काही महिन्यांत पुन्हा नव्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, एक फेब्रुवारी ते आठ डिसेंबरदरम्यान दोन्ही डोस घेतलेल्या १९,७०१ लाभार्थ्यांमध्ये संसर्ग झाला होता; तर चार जानेवारीपर्यंत ही संख्या ४०,५३६ वर पोहोचली आहे. याच कालावधीत तुलनेने, एकच डोस झालेल्या व्यक्तींमध्ये १७, ४०३ वरून चार जानेवारीपर्यंत १८,३५६ पर्यंत वाढ झाली.
एक फेब्रुवारी २०२१ ते चार जानेवारी २०२२ या ११ महिन्यांच्या कालावधीत एक डोस झालेल्या व्यक्तींमध्ये ०.१८ टक्क्यांच्या तुलनेत पूर्ण लसीकरण झालेल्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण ०.५ टक्के इतके जास्त होते. मुंबईत १.८१ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. ८१,३७,८५० लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यातील अंशतः लसीकरण केलेल्या १८,३५६ किंवा ०.१८ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे; तर ४०,५३६ पूर्ण लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांना संसर्ग झाला असून त्याचे प्रमाण ०.५० टक्के एवढे आहे.
नोव्हेंबर महिन्यात कोविडचा आलेख स्थिर झाला होता. तेव्हा एक फेब्रुवारी ते सात नोव्हेंबर २०२१ दरम्यान, पहिला डोस घेतलेल्या ३५,२४,६५३ व्यक्तींपैकी १६,९३३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्या ब्रेक थ्रूचे प्रमाण ०.४८ टक्के एवढे होते; तर पूर्णपणे लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांमध्ये संसर्ग दर ०.३० टक्के होता. कारण दोन्ही डोस घेतलेल्या ५३,८३,९४५ पैकी १५,९६५ व्यक्तींना संसर्ग झाला होता.
चौकट
नियमावलीचे पालन आवश्यक
तज्ज्ञांनी या ब्रेक थ्रू संसर्गासाठी दोन प्रमुख निरीक्षणे मांडली आहेत. त्यापैकी एक रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे आणि कोविड १९ संदर्भातील नियम न पाळणे. तज्ज्ञांच्या मते, पहिला डोस नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान मिळाला होता, त्यांना अँटीबॉडीचा प्रतिसाद जास्त होता आणि त्यातच ज्यांचे दोन्ही पूर्ण झाले आहेत, अशांमध्ये कमी संसर्ग नोंदला आहे. पण आता लोकांनीही काळजी आणि सुरक्षा घेणे कमी केले आहे.
कोट
अनेकांना ८ ते १० महिन्यांपूर्वी लसीकरण करण्यात आले आहे. आता त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली असावी, ज्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे बूस्टर डोसची मागणी वाढली आहे. मात्र, दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या ब्रेक थ्रूचा संसर्गाचा धोका कमी आहे. याचा अर्थ कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कोविडसह इतर कोणत्याही विषाणूपासून कोणतीच लस १०० टक्के सुरक्षा देऊ शकत नाही.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त.