सेल्फ टेस्ट किटसाठी
मोबाईल क्रमांक सक्तीचा
अर्जही भरून द्यावा लागणार; महापालिकेची नियमावली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कोविडची सेल्फ टेस्ट किट खरेदी करणाऱ्यांना आता पूर्ण निवासी पत्त्यासह मोबाईल क्रमांक नमूद असलेले अर्ज भरून विक्रेत्यांकडे द्यावे लागणार आहेत. महापालिकेने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ग्राहकांबरोबर उत्पादक कंपन्या, वितरक, दुकानदार यांच्यासाठीदेखील नियमावली तयार करण्यात आली आहे.
मुंबईत कोविडच्या तीन लाखांहून अधिक सेल्फ किटची विक्री झाली आहे. महापालिकेला त्यातील फक्त एक लाख अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित दोन लाख नागरिकांनी अहवाल संबंधित मोबाईल ॲप्लिकेशनवर भरलेले नसल्याने त्यांच्याबाबत कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्र सरकारनेही निर्देश दिले आहेत. आता महापालिका प्रशासनाने याबाबत नियमावली तयार केली आहे.
नियमावलीनुसार उत्पादक कंपन्या आणि वितरक यांना मुंबईतील औषधांची दुकाने, दवाखान्यांना विकल्या गेलेल्या किटबाबत माहिती भरलेले अर्ज अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना whogmp.mahafda@gmail.com वर तसेच महापालिकेच्या साथ नियंत्रण विभागाला mcgm.hometests@gmail.com या ई-मेलवर पाठविणे आवश्यक आहे. विक्रेते आणि दवाखान्यांनाही खरेदीदाराचा नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद असलेले अर्ज भरून घ्यायचा आहे. नंतर हा अर्ज अन्न व औषध प्रशासनासह महापालिकेच्या ई-मेलवर पाठवायचा आहे. या दोन्ही अर्जांचे नमुनेही महापालिकेने प्रसिद्ध केले आहेत.
--------
एफडीएही नजर ठेवणार
नियमावलीनुसार आता सेल्फ किट खरेदीदाराची माहिती पालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सेल्फ किटद्वारे आलेल्या चाचणीचा अहवाल संबंधित व्यक्ती आयसीएमआरच्या संकेत स्थळावर अथवा ॲपवर अपलोड करेल, याची खबरदारी प्रभागातील आरोग्य अधिकाऱ्याने घ्यायची आहे. अन्न व औषध प्रशासन विभागदेखील (एफडीए) किट्सच्या वितरण आणि विक्रीवर देखभाल ठेवणार आहे.